मस्त रात्र ही मस्त,Masta Ratra Hi Masta

मस्त रात्र ही, मस्त पवन हा, मस्त चंद्र हा, मस्त चांदणे
धुंद या क्षणी धुंद हो‍उनी धुंद जिवांचे धुंद वागणे !

डोंगरमाथे उभे पलिकडे, नदी खळखळे अशी अलिकडे
तिथेच वळत्या नदीतिरावर, एक शिवालय उभे तेवढे
भवती हिरवागार किनारा, हिरवळिचे ते मंद डोलणे !

झुळुक चुळबुळे लाट खळखळे, पाण्याखाली जाय पायरी
खुशाल भिजती त्यात पाउले, उन्मादक अन्‌ गोरी गोरी
भिजेल म्हणुनी वस्त्र रेशमी, मधेच थोडे वर आवरणे !

वडीलधारे गाव बिचारे, वरल्या अंगा झोपी गेले
पल्याडली ती पाटिलवाडी, तिनेहि आता डोळे मिटले
कानी म्हटले कुणी कुणाच्या, "कुणी न आता इकडे येणे" !

जागे नव्हते तिसरे कोणी, जागे दोन्ही जीव तेवढे
हातामधले कंकण हलके, किणकिणले मग मधेच थोडे
एकांतावर अद्भुत जादू वरुन पसरली त्या चंद्राने !

मध्यरात्रिचा थंड गारवा, सुंदर त्यातुन रात्र चांदणी
नाजुक बोटे, कणखर मनगट याचे हरपे भान त्या क्षणी
निसर्ग निर्दय, मानव दुर्बळ, कुणी कुणाला मग सावरणे ?

No comments:

Post a Comment