मज सांग लक्ष्मणा जाउं,Maj Sang Laxmana Jau

मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें ?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें ?

कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्त्रा जेथे अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे

व्यर्थ शिणविलें माता जनका
मी नच जाया, नवे कन्यका
निकषच मानीं कासें कनका
सिद्धीच तपाला आज विटे

अग्नी ठरला असत्यवक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
चरणिंच्या धरेसी कंप सुटे

प्राण तनुंतुन उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती ?
बाहतसे मज श्रीभागिरथी
अडखळें अंतिंचा विपळ कुठें ?

सरलें जीवन, सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरीं रूप हे, सुमन मिटें

वनांत विजनीं मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
जानकी जनांतुन आज उठे

जाई देवरा, पुरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव, केवळ नृपती
बोलतां पुन्हां ही जीभ थटे

इथुन वंदितें मी मातांना
प्रणाम पोंचवि रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना
आणखी ओठिं ना शब्द फुटे

No comments:

Post a Comment