मैत्रिणींनो थांबा थोडं,Maitrino Thamba Thoda

मैत्रिणींनो थांबा थोडं खुशाल मागनं हसा !
चला इचारु या येडीला संसार करशील कसा ?

गोरीपान ही काया कवळी, ओल्या हळदीनं होईल पिवळी
लगीन होता सासरी जाता जीव होईल ग पीसा !
पी पी सनई, तडाम्‌ चौघडा, पंचकल्याणी येईल घोडा
त्यावर दोघं बसा !
मैत्रिणींनो थांबा थोडं खुशाल मागनं हसा !
चला इचारु या येडीला संसार करशील कसा ?

नको करु लई नट्‍टापट्‍टा, दीर नणंदा करतिल थट्‍टा
सासूवरती तोंड टाकुनी बोलु नको वसवसा
भरताराला नको मागणं मोकळा होईल खिसा
मैत्रिणींनो थांबा थोडं खुशाल मागनं हसा !
चला इचारु या येडीला संसार करशील कसा ?

नाद नसावा शेजारणीचा, मंतर देतील कानफुटीचा
मनोमनी ग पती पुजावा देवावानी जसा !
दान-धर्माला म्होरं होऊन, कुणि भिकारी दारी पाहून
द्यावा ओंजळ पसा !
मैत्रिणींनो थांबा थोडं खुशाल मागनं हसा !
चला इचारु या येडीला संसार करशील कसा ?

नव्या नवरीनं थोडं हसावं, सुगरणीवाणी काम दिसावं
घरंदाज या कुलशिलाचा वटित घे ग वसा !
मैत्रिणींनो थांबा थोडं खुशाल मागनं हसा !
चला इचारु या येडीला संसार करशील कसा ?

No comments:

Post a Comment