प्रीतिच्या पूजेस जाता,Preetichya Poojes Jata

प्रीतिच्या पूजेस जाता मी अशी का थांबले ?
दाटते भीती उरी, थबकती का पाऊले ?

दर्शनाची ओढ जीवा, दार उघडे स्वागता
अर्पणाचे तबक हाती, आडवी ये भीरुता
स्त्रीपणाच्या जाणिवेने शेवटी का गाठले

चढुन जाता पायऱ्या या मानिनी होते सती
देवता येथून गेल्या, पद्मजा वा पार्वती
पुण्यपंथी चालता या मी का भांबावले


दूर हो लज्जे जराशी, मजसी आता जाऊ दे
साजरे सौभाग्य माझे, मजसी पुरते पाहू दे
दोन जीवा जोडणारे, जोडवे हे वाजले