पळविली रावणें सीता,Palavili Ravane Sita

मरणोन्मुख त्याला कां रे मारिसी पुन्हां रघुनाथा ?
अडवितां खलासी पडलों, पळविली रावणें सीता

पाहिली जधीं मी जातां
रामाविण राज्ञी सीता
देवरही संगे नव्हता
मी बळें उडालों रामा, रोधिलें रथाच्या पंथातो नृशंस रावण कामी
नेतसे तिला कां धामीं
जाणिलें मनीं सारें मी
चावलों तयाच्या हातां, हाणिले पंख हे माथां

रक्षिण्या रामराज्ञीसी
झुंजलों घोर मी त्यासी
तोडिलें कवचमुकुटासी
लावूं नच दिधलें बाणां, स्पर्शूं ना दिधला भाता

सर्वांगा दिधले डंख
वज्रासम मारित पंख
खेळलो द्वंद्व निःशंक
पाडला सारथी खाली, खाइ तो खरांच्या लाथा

सारुनी दूर देवीस
मोडिला रथाचा आंस
भंगिलें उभय चक्रांस
ठेंचाळुनि गर्दभ पडलें, दुसऱ्याच्या थटुनी प्रेता

लोळलें छत्रही खालीं
युद्धाची सीमा झाली
मी शर्थ राघवा, केली
धांवला उगारुन खड्गा, पौलस्ती चावित दांता

हे पंख छेदिल्यावरती
मी पडलो धरणीवरती
ती थरथर कांपे युवती
तडफडाट झाला माझा, तिज कवेंत त्यानें घेतां

मम प्राण लोचनीं उरला
मी तरी पाहिला त्याला
तो गगनपथानें गेला
लाडकी तुझी सम्राज्ञी, आक्रंदत होती जातां

No comments:

Post a Comment