नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा,
बंधुहो । जयजयकार करा,
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत,
निरंतर । असो तुझे स्वागत,
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विलसती
बुद्धिचे । वसंत जे विलसती,
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयुरावरी
दिप्ति जी । चित्तमयूरावरी,
त्या दिप्तीला, त्या ज्ञप्तीला, वदती वागीश्वरी.
हे वाग्देवी, असे प्रार्थना ये या संकीर्तना,
उत्सवा । ये या संकिर्तना,
जगन्मंगले, सकल मंगलासह दे पददर्शना.
सगुण शांत त्वच्चित्रमूर्तिला गातो मी गायन,
शारदे । गातो मी गायन,
धन्य धन्य सौंदर्य, धन्य त्वत्प्रसन्नपुण्यानन.
किरिट शोभला त्वन्मौलीला अमूल्य तत्वांचा
शारदे । अमूल्य तत्वांचा,
अरुणराग त्यातून उधळला सद्गुणरत्नांचा.
डोले कंठी सच्छास्त्रांचा चंद्रहार हासरा,
पाहुनी । चंद्रहार हासरा,
भाली फुलला, गाली खुलला काव्यदिव्यबिजवरा.
सौंदर्याहुनि दिव्य दिव्यतर हिचे ज्ञान सुंदर,
खरोखर । हिचे ज्ञान सुंदर,
त्या ज्ञानाहुनी जगात सुंदर एकच परमेश्वर.
हृदयमंदिरी प्राणशक्तीचे झोपाळे डोलवी
देवि ही । झोपाळे डोलवी,
सुखदु:खांचे देउनि झोके जीवांना खेळवी.
विचारकारंज्यावर तुषार शब्दांचे नाचवी,
देवि ही । शब्दांचे नाचवी,
जीवात्मा त्यातून बोलवी परमात्मा डोलवी.
चराचरांचा दावि चित्रपट अमुच्या स्मरणावर
भराभर । अमुच्या स्मरणावर,
विजेऐवजी त्यात जळे चिच्चंद्राचे झुंबर.
No comments:
Post a Comment