नाच ग घुमा, कशी मी नाचू ?
ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
फू बाई फू फुगडी चमचम् करतीया बुगडी !
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
बारा घरच्या बायका एक जागी मिळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे !
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागिवली पोरी पिंगा !
फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !
शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !
भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !
तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !
भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !
भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !
No comments:
Post a Comment