बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
सह्यगिरीतिल वनराजांनो, या कुहरातुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखाया स्तव करा हिमालय लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो, समरदेवता बोलविते
खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते
कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहात आज या एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते
No comments:
Post a Comment