त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा
सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा
इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे
जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे
मी तळमळताही निर्विकार जन सारे
पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा !
ऐकली न येथे आपुलकीची बोली
बहरली न आशा मनात अंकुरलेली
सारखी विफलता व्यथा माझिया भाली
पलिकडे हासतो जीवन-श्रेय-फुलोरा !
पलिकडे मनोमय स्वप्नांचा संसार !
पलिकडे सुगंधित गीतांचा झंकार !
संतप्त उरास्तव वत्सल अमृतधारा !
बहरला मळ्यांनी वैभवपूर्ण किनारा !
No comments:
Post a Comment