नकोस नौके, परत फिरूं ग, नकोस गंगे, ऊर भरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे, जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवूं मेघ
भाग्य आपुलें अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं
श्री विष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
तारक त्याला तारुन नेऊं, पदस्पर्षांनें सर्व तारुं
जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
ऐल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतिल कल्पतरू
कर्तव्याची धरुनी कांस
राम स्वीकरी हा वनवास
दासच त्याचे आपण, कां मग कर्तव्यासी परत सरूं ?
अतिथि असो वा असोत राम
पैल लाविणे अपुलें काम
भलेंबुरें तें राम जाणता, आपण अपुलें काम करूं
गंगे तुज हा मंगल योग
भगिरथ आणि तुझा जलौघ
त्याचा वंशज नेसी तूंही-दक्षिण देशा अमर करूं
पावन गंगा, पावन राम
श्रीरामांचें पावन नाम
त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरूं
No comments:
Post a Comment