दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो !
तारकांस हालचाल मी तुझी विचारतो !
वाटते कधी चुकून
भेटशील तू अजून
थांबतो पुन्हा मधून
अन् उगीच सावल्यात सैरभर पाहतो !
चाललो असेच गात
ऐकते उदास रात
चंद्रमा झुरे नभात
अन् इथे फुलाफुलात मी तुलाच शोधतो !
वेड लागले जिवास
हे तुझे दिशात भास
हा तुझा मनी सुवास
आपल्याच आसवांत मी वसंत ढाळतो !
No comments:
Post a Comment