दशरथा घे हें पायसदान,Dasharatha Ghe He

दशरथा, घे हें पायसदान
तुझ्या यज्ञिं मी प्रगट जाहलें हा माझा सन्मान

तव यज्ञाची होय सांगता
तृप्त जाहल्या सर्व देवता
प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, श्रीविष्णू भगवान

श्रीविष्णूंची आज्ञा म्हणुनी
आलों मी हा प्रसाद घेउनि
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान

करांत घे ही सुवर्णस्थाली
दे राण्यांना क्षीर आंतली
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज हिचे बलवान

राण्या करितिल पायसभक्षण
उदरीं होईल वंशारोपण
त्यांच्या पोटीं जन्मा येतिल, योद्धे चार महान

प्रसवतील त्या तीनहि देवी
श्रीविष्णूंचे अंश मानवी
धन्य दशरथा, तुला लाभला, देवपित्याचा मान

कृतार्थ दिसती तुझीं लोचनें
कृतार्थ मीही तुझ्या दर्शनें
दे आज्ञा मज नृपा, पावतो यज्ञीं अंतर्धान

No comments:

Post a Comment