दाम करी काम येड्या,Daam Kari Kaam Yedya

बारा डोळ्यांनी पापं सारी नारायण बगतो
पैशापायी माणूस मरतो पैशावर जगतो

वासुदेवाची ऐका वाणी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम रे

पैशाची जादू लई न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय्‌ झेप, पैशाच्या मागूनी धाव
जल्मापासनं सारी माणसं ह्या पैशाची गुलाम रे

कुनी जुगार सट्टेबाज कुनि, कुनि खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुनि घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखुर सुटला, फेकला त्यानं लगाम रे

ह्या कवडी दमडी पाई, कुनि राकूस घेई जीव
कुनि डाका दरोडा घाली, कुनि जाळून टाकी गाव
बगलंमंदी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे

नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं शिरिमंतीनं, हातात नाही छदाम रे

वाड्यात पंगती बसल्या लई आग्रेव जागोजाग
दारात भिकारी रडतो, पोटात भुकंची आग
संसाराचं ओझं घेऊन, कुनी टिपावा घाम रे

नाचते नारीची अब्रू छनछुन्नक तालावरती
पैशानं बायको खुस, पैशानं बोलते पिरती
ह्या पैशाच्या बादशहाला, दुनिया करते सलाम रे

No comments:

Post a Comment