थंडीची झोप मला Thandichi Jhop Mala

माघाची रात चांदणं त्यात

कुशी बदलून काही भागंना

थंडीची झोप मला लागंना !




डावा डोळा लवतो खुळा

नशीब काही बाई जागंना

थंडीची झोप मला लागं ना !




सखा लढाईला गेला,

गेला तो अजून नाही आला

घरी नार तरणी लागली झुरणीला,

तपास केला वाया गेला

कुणीच काही मला सांगंना

थंडीची झोप मला लागंना !




दिवसभर मी तळमळते,

रात्री समईसंगं जळते

बायकांचं दु:ख बायकांनाच कळते

फुरफुर करी समईपरी,

घोड्याची टाप काही वाजंना

थंडीची झोप मला लागंना !




आता झाली ग पहाट

किती न्याहाळू मी वाट ?

आली जांभई, बाई

माझी अवघडली पाठ

पुन्हा सुरु तो रहाट

माझे डोळे, त्याची वाट

नीज नाही सूज आली

माझ्या डोळ्यांना दाट

उचकी येते सई होते

शकुनाचं फळं लाभंना

थंडीची झोप मला लागंना !

No comments:

Post a Comment