चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा
विश्व रागें झाले वन्ही
संती सुखें व्हावें पाणी
शब्द शस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश
विश्व पट ब्रह्मदारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ब्रह्म जैसें तैशा परी
आम्हा वडील भूतें सारी
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे
जीभ दातांनी चाविली
कोणें बत्तीशी तोडीली
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
No comments:
Post a Comment