जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे
जगणाऱ्याने जगता जगता मजेत गावे गाणे
आयुष्याच्या वेलीवरती भावफुले बहरावी
ती वेचाया अलगद खाली नक्षत्रे उतरावी
नक्षत्रांच्या श्वासांतुनही पेरित जावे गाणे
पाऊस-पाणी-प्रकाश-वारा-पक्षी-सागर-सरीता
परमेशाच्या प्राणांमधल्या जिवंत साऱ्या कविता
आनंदाने मिळेल त्याचे कवेत घ्यावे गाणे
जगण्याचे बळ उदंड देते गाणे प्रत्येकाला
तिथे न कोणी अमर अखेरी जाणे प्रत्येकाला
जाता जाता दुनियेसाठी उधळून जावे गाणे
No comments:
Post a Comment