चंद्र आणखी प्रिती,Chandra Aanakhi Preeti

चंद्र पाहता स‍इ प्रीतीची तरुण मना का येते ?
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग कलावती तू, तुला असावी अचूक तयाची जाण ग
अन्‌ प्रीतनगरचा राजा मन्मथ, चंद्र तयाचा प्रधान ग !
अग प्रीतनगरची प्रजा तयाच्या मुजऱ्यासाठी येते
अन्‌ प्रधान साक्षी ठेवून राणी आण प्रीतीची घेते

तोंडावरती जडे काळीमा, झिजते ज्याची कला कला
तो मदनाचा मंत्री कैसा समजून सांगा तुम्ही मला ?
गुरुपत्‍नीशी पाप करी हा, शाप बाधला याते
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग चंद्र उगवता समुद्र उसळे, चढती डोंगर लाटा

अन्‌ तो देखावा प्रीतरसाचा शाहीर म्हणती मोठा
अग नभ धरणीचे अंतर त्यांच्या प्रीतिने तुटते
अन्‌ चंद्र आणखी प्रिती यांचे तूच ठरव गे नाते !

लाटा उठती सागरात ज्या, त्या तर त्याच्या लेकी
चंद्र-लहरींची प्रीत जोडिती त्यांची फिरली डोकी !
सख्खी बहिण अन्‌ सख्ख्या भावाची प्रीत कधी का होते ?
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग चंद्र कसा ग होईल भाऊ उगाच सागरलाटांचा ?
अन्‌ आधारासी दाव पुरावा, नको धिटावा ओठांचा !

देव-दानवी समुद्र मंथन पुराणांतरी केले ना !
मंथनात त्या रत्‍न चंद्रमा उसळुन वरती आले ना !
जन्म पावला सागरपोटी तो तर त्याचा बेटा
त्याच सागरी जन्मतात ना निळ्या उसळत्या लाटा !


अहो बहिण-भाऊ याहुन कुठले चंद्र-लहरिंचे नाते ?
चंद्र पाहता स‍इ प्रितीची तरुण मना का येते ?



No comments:

Post a Comment