चला राघवा चला
पहाया जनकाची मिथिला
मिथिलेहुनिही दर्शनीय नृप
राजर्षी तो जनक नराधिप
नराधिपें त्या नगरीमाजीं यज्ञ नवा मांडिला
यज्ञमंडपी सुनाभ कार्मुक
ज्यास पेलता झाला त्र्यंबक
त्र्यंबक देवे त्याच धनुनें त्रिपुरासुर मारिला
शिवधनुतें त्या सदनीं ठेवुन
जनक तयाचें करितो पूजन
पूजनीय त्या विशाल धनुला जगांत नाहीं तुला
देशदेशिंचे नृपती येउन
स्तिमित जाहले धनुष्य पाहुन
पाहतांच तें उचलायाचा मोह तयां जाहला
देव, दैत्य वा सुर, नर, किन्नर
उचलुं न शकले त्यास तसूभर
तसूभरी ना सरलपणा त्या चापाचा वांकला
कोण वांकवुन त्याला ओढिल ?
प्रत्यंचा त्या धनूस जोडिल ?
सोडिल त्यांतुन बाण असा तर कोणी ना जन्मला
उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर
निजनयनीं तें धनू पहा तर
बघा राघवा, सौमित्री तर औत्सुक्यें दाटला
उत्साहाने निघती मुनिजन
चला संगतीं दोघे आपण
आपण होतां सहप्रवासी भाग्यतरू ये फला
No comments:
Post a Comment