चल चल चंद्रा पसर,Chal Chal Chandra Pasar

चल चल चंद्रा पसर चांदणे
किती बाई आम्ही वाट पाहणे

मावळतीची मुग्ध पश्चिमा
पसरी अपुला लाल रक्तिमा
झुळकत झुळकत बिलगायाला
सायंवारा दुरुनी आला
तोहि गुणगुणे एकच गाणे !

तळ्‍यांत अवखळ जललहरींनी
धरिला अमुच्या फेर भवतिंनी
नाचत नाचत अमुच्या भवती
नाजुक गुजगोष्टी कुजबुजती

छुमछुम घुमवित किरण-पैंजणे

रानावरती गगनामधुनी
अलगद उतरे रजनीराणी
क्षणभर झाला निसर्ग निश्चल
उमलायाची घटिका मंगल
आली ना रे, का मग छ्ळणे !

No comments:

Post a Comment