कोणता मानू चंद्रमा,Konata Manu Chandrama

कोणता मानू चंद्रमा ?
भूवरीचा की नभीचा, मानू चंद्रमा

बघुनी सखिमुख वाटे हृदयी
चंद्र कशाला भूवर येई
बघता गगनी चंद्र तिथेही
वरिते मानस सुखद संभ्रमा

गगनी रजनी, भुवरी रजनी
दिसतो चंद्रहि दोन्हि ठिकाणी
एकावरि ये कलंक दिसुनी
दावि दुजा निजनयन-नीलिमा

एक फुलवितो कमल-विशेषा

दुजा फुलवि मम मानस-कोषा
एक करितसे की तमनाशा
नाशी दुसरा मम विरह-तमा

संधिकाल जव चुंबी एका
चढते लाली त्वरित तन्मुखा
दुज्यास अधरी अधर जुळविता
खुले कपोली प्रणय-रक्तिमा

नभोमुकुरि की सखी बघतसे
बिंब मुखाचे तिथे पडतसे
जन नयना ते चंद्र गमतसे
पसरी तेच का भुवनी सुषमा

चंद्र कोणता वदन कोणते
शशांक मुख की मुखशशांक ते
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखदसंभ्रमा

4 comments:

 1. ही कविता मला खूपच आवडली, उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
  कवितांच्या खाली कवीचं नाव लिहिले असते तर छान असते

  ReplyDelete
 2. Kavi Gunawant Hanumant Deshpande hote

  ReplyDelete
 3. Kavi Gunawanta hanumanta Deshpande

  ReplyDelete
 4. YouTube vr gajanan watve yanchya aawajat aika

  ReplyDelete