केतकीच्या बनात
उतरत्या उन्हात
सळसळ पानात-
जपून जा !
जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !
पायवाट लपेल
काटाकुटा रुपेल
तळव्यात खुपेल-
जपून जा !
ढग येता दाटून
मग वाट कोठून
पाय ठेवू रेटून-
जपून जा !
जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !
उसळत्या वयात
बळ तुझ्या पायात
चाल ठेव कह्यात
जपून जा !
फसू नको मोहात
जरा उभी रहात
मागेपुढे पहात
जपून जा !
जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !
वादळाच्या वाऱ्यात
नको चालू तोऱ्यात
पडशील भवऱ्यांत
जपून जा !
जाऊ नको गुंगत
स्वप्नात रंगत
तुझी तुला संगत
जपून जा !
जपून जा गडे जपून जा-
कुठे निघेल नाग !
No comments:
Post a Comment