कशि गौळण राधा बावरली !
जलभरणा यमुना गेली
शीळ खुणेची अवचित आली
रोमांचित काया थरथरली !
कृष्ण सावळा गोरी राधा
कृष्णसख्याची जडली बाधा
कृष्णच नेत्री, कृष्णच गात्री
कृष्णात राधिका विरघळली !
लाजेचीही वसने फिटली
लोकांमधुनी राधा उठली
राधा-मोहन होता मीलन
हरिकांति तनूवर पांघरली !
No comments:
Post a Comment