कलिका कशा ग बाई भुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या
सजून-धजून बाई, भरात कलली जाई
लाजून-बुजून बाई, उरात फुलली जुई
फुलली जाई फुलली जुई
जाई-जुई जाई-जुई
फुलल्या कशा ग बाई फुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या
अवखळ वाऱ्यात काळोख वाहे
थरथर पानात भरून राहे
सलज्ज कोवळ्या जाईजुईच्या
मनात चांदणे चोरून पाहे
भवती काजळी राही, धवल ठसली जाई
तमाळ रंगात काही, विभोर हसली जुई
झुलली जाई झुलली जुई
जाई-जुई जाई-जुई
झुलल्या कशा ग बाई झुलल्या
इवल्या फुलात बाई फुलल्या
मुग्ध हरपल्या कुपित, चित्तचोर गंध कोंदला
लुब्ध उकलता गुपित ओसंडून मुक्त नांदला
नितळ निवांत पाही नाजूक-साजूक जाई
झाकून तळवे राही मिटून लोचन जुई
डोलली जाई डुलली जुई
जाई-जुई जाई-जुई
डुलल्या कशा ग बाई डुलल्या
इवल्या फुलात बाई खुलल्या
रात्र संपली, निळी उषा सुरम्य रंग रंगली
माळ गुंफली पहाट पाकळ्यां-कळ्यांत दंगली
ढळल्या दिशात दाही नाचली मोहक जाई
वळल्या नभात वाही सुगंध साजिरी जुई
कळली जाई कळली जुई
जाई-जुई जाई-जुई
कळल्या कशा ग बाई कळल्या
झुलल्या कशा ग बाई झुलल्या
कलिका कशा ग बाई भुलल्या
फुलल्या कशा ग बाई फुलल्या
No comments:
Post a Comment