अग, काय सामना करू तुझ्याशी, नारीजात तू दुबळी ग
हुकूम पाळिता पुरुषजातीचा सरे जिंदगी सगळी ग
बाळपणी तुज धाक पित्याचा, तरुणपणी तुज हवा पती
वृद्धपणा तव पुत्राहाती, स्वतंत्र बुद्धी तुला किती ?
अरे नको वाढपण सांगू शाहिरा, पुरूषजातीची फुकाफुकी
स्त्रीजातीच्या अकले पुढती तुझी बढाई पडंल फिकी
सावित्रीच्या चतुरपणाने यमधर्माला दिला धडा
असेल ठावी कथा जरी ती, बोल मज पुढे घडाघडा !
अग तूच सांग ग, कोणासाठी सावित्री ते दिव्य करी
सावित्रीची कथा सांगते पुरूषप्रितिची मातबरी !
पतीवाचूनी कसे जगावे हाच तियेला प्रश्न पडे
इथेच ठरला पुरूष श्रेष्ठ की, चतूर सारीके, बोल पुढे !
पुरुषावाचून जन्मे नारी, या पृथ्वीचा कोण पती ?
पित्यावाचुनी जन्मा आली, काय थांबली तिची गती ?
अग अज्ञानाने नकोस बोलू, आभाळाची सुता धरा
गती कशाची, सूर्याभोवती फिरे नार ती गरागरा !
पुरुषासाठी नार जन्मते, पुरुषासाठी जन्म तिचा
वृक्षावाचुनी जन्म पांगळा, फुलारणाऱ्या वेलीचा !
अरे सांग शाहीरा नारीवाचुन पुरूषहि झाला कधी पुरा ?
पुराणशास्त्रे धुंडून पाही, धुंड गगन की वसुंधरा
ताऱ्यामाजी शुक्र नांदतो, वाऱ्यासाठी उभी हवा
पृथ्वीभवती चंद्र फिरतसे, वेष घेऊनी नवा नवा
चकला ना गे, चतुरपणा तव, माझ्या मार्गी तूच पुढे
नारिनराच्या प्रेमावाचुन जगावरी काय घडॆ ?
हवा कशाला कलह सांग हा, आपसातला खुळ्या परी
हारजितीची हौसच खोटी, तुझी नि माझी बरोबरी
No comments:
Post a Comment