असावा असा सुखी संसार
आनंदच जणु नांदे घेऊन घरट्याचा आकार
पहाट उठते गुंजत गाणी
गात गात ही दिवेलागणी
आल्या अतिथ्या मूठभर देई अन्न उदार दुपार
असावा असा सुखी संसार
दिसते ते ते येथे निर्मळ
बोल उमटतो तो तो मंजूळ
खिडकीपाशी म्हणून थबकतो वारा वारंवार
असावा असा सुखी संसार
धनीण घरची सुरेख हसरी
प्रीत धन्याची फार तिजवरी
उद्योगाने उजेड उजळे स्वप्न बघे अंधार
असावा असा सुखी संसार
No comments:
Post a Comment