असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा
अस्मानाला असा चढावा कैफ सात रंगांचा
मावळतीला चंद्र झुकावा जरा फिकट अंगाचा
हळव्या पानांतून मोहरत मोहक गंध फुलावा
भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधूर स्वराने
हुंकारातुन असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा
प्रशांततेवर कुणि स्मिताची रेघ अशी रेखावी
मिठीतले क्षण दिठीत टिपण्या तू मजजवळ असावी
लाजलाजुनी असा फुलोरा वेलीवर विहरावा
झुळझुळणाऱ्या निर्झरिणींची चरणगती तू घ्यावी
मला पाहण्या तुझी लोचने अशीच झुरत असावी
तव अधरांतिल मरंद माझ्या ओठांवर उतरावा
No comments:
Post a Comment