अपुल्या हाती नसते काही, हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले, हाती घ्यावे
कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला
पाण्याने जर लळा लाविला, रुजून यावे
भिरभिरणाऱ्या फूलपाखरा नसे नकाशा
विसावले जर, ओंजळीचे तर फूल करावे
नको याचना जीव जडवुनी बरसातीची
मेघच जर जाहले अनावर, भिजून घ्यावे
नकोच मनधरणी अर्थाची नको आर्जवे
शब्दांनी जर मिठी घातली, गाणे गावे
No comments:
Post a Comment