आज कां निष्फळ होती बाण ?
पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण ?
शरवर्षावामाजीं दारुण
पुन्हां तरारे तरुसा रावण
रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण ?
चमत्कार हा मुळिं ना उमजे
शीर्ष तोडितां दुसरें उपजें
रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण ?
शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं
नभीं उडविलीं, पदीं तुडविलीं
पुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान
इंद्रसारथे, वीर मातली
सांग गूढता मला यांतली
माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान
वधिला खर मी, वधिला दूषण
वधिला मारिच, विराध भीषण
हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण
ज्यांच्या धाकें हटला सागर
भयादराचे केवळ आगर
त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण ?
सचैल रुधिरें न्हाला रावण
सिंहापरि तरि बोले गर्जुन
मलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान ?
सचिंत असतिल देव, अप्सरा
सुचेल तप का कुणा मुनिवरा ?
व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान ?
No comments:
Post a Comment