बघ माझी आठवण Bagh Mazi Athavan


बघ माझी आठवण येते का....

मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

Lyrics - सौमित्र SOUMITRA
Music - मिलिंद इंगळे MILIND INGALE
Singer - मिलिंद इंगळे MILIND INGALE
Movie / Natak / Album - गारवा GARAVA

No comments:

Post a Comment