सुरांनो जाऊ नका रे,Surano Jau Naka Re

मावळतीचे रंग पुसटले भरून आला ऊर
सुरांनो जाऊ नका रे दूर

इथवर संगे आलात माझ्या
आठवणी या मनात ताज्या
तुमच्यावीण हे जीवन सारे होईल रे बदसूर

संगत माझी करीत आला
दोन पाऊले आणखी चाला
आरतीस या तुम्हीच लावा शेवटचा कापूर

तिन्हिसांज रे झाली आता
रात कलावी गाणे गाता
जोवर तुम्ही गळ्यात तोवर राहिल माझा नूर

जिथे वेचले माणिक मोती
तिथेच पुसली अवघी नाती
फिरेल शोधित जग हे माझ्या राखेमधले सूर

No comments:

Post a Comment