वालीवध ना खलनिर्दालन,Vali Vadh Na Khal Nirdalan

मी धर्माचें केलें पालन
वालीवध ना, खलनिर्दालन

अखिल धरा ही भरतशासिता
न्यायनीति तो भरत जाणता
त्या भरताचा मी तर भ्राता
जैसा राजा तसे प्रजाजन

शिष्य, पुत्र वा कनिष्ठ भ्राता
धर्मे येते त्यास पुत्रता
तूं भ्रात्याची हरिली कांता
मनीं गोपुनी हीन प्रलोभन

तूं तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
अंत असा हा विषयांधांचा
मरण पशूचें पारध हो‍उन

दिधलें होतें वचन सुग्रिवा
जीवहि देइन तुझिया जीवा
भावास्तव मी वधिलें भावा
दिल्या वचाचें हें प्रतिपालन

नृपति खेळती वनिं मृगयेतें
लपुनि मारिती तीर पशूतें
दोष कासया त्या क्रीडेतें
शाखामृग तूं क्रूर पशूहुन

अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळिन मी तुझ्या अंगदा
राज्य तुझें हें, ही किष्किंधा
सुग्रीवाच्या करीं समर्पण

No comments:

Post a Comment