लक्ष्मणा तिचींच ही पाउलें,Laxmana Tichich Hi Paule

हीं तिच्या वेणिंतिल फुलें
लक्ष्मणा, तिचींच ही पाउलें

एक पदांचा ठसा राक्षसी
छेदित गेला पदचिन्हांसी
वादळें तुटली पद्मदलें

खचित लक्ष्मणा, खचित या स्थलीं
रात्रिंचर कुणि छळी मैथिली
जिंकली का सती अंगबलें ?

दूर छिन्न हें धनु कुणाचें ?
जडाव त्यावर रत्‍नमण्यांचे
कुणाला कोणी झुंजविलें ?

वैदुर्यांकित कवच कुणाचें ?
धुळिंत मिळाले मणी तयाचे
राक्षसा कोणीं आडविलें ?

पहा छत्र तें धूलीधूसर
मोडुन दांडा पडलें भूवर
कुणीं या सूतां लोळविलें ?

प्रेत हो‍उनी पडे सारथी
लगाम तुटके तसेच हातीं
तोंड तें रुधिरें भेसुरलें

पहा रथाचें धूड मोडके
कणा मोडला, तुटलीं चाके
बाणही भंवती विस्कटले

थंड दृष्टिनें न्याहळीत नभ
मरून थिजले ते बघ रासभ
कुणाचें वाहन हें असलें ?

अनुमानाही पडे सांकडें
कोणी नेली प्रिया ? कुणिकडे ?
तिच्यास्तव दोघे कां लढले ?

हृता, जिता वा मृता, भक्षिता
कैसी कोठे माझी सीता ?
गूढ तें नाहीं आकळलें

असेल तेथुन असेल त्यांनी
परतुन द्यावी रामस्वामिनी
क्षात्रबल माथीं प्रस्फुरलें

स्वर्गिय वा तो असो अमानुष
त्यास जाळण्या उसळे पौरुष
कंपविन तीन्ही लोक बलें

No comments:

Post a Comment