नील नभाची तप्त वेदना लाल मुशीतून निथळत राही
बींब होऊनी क्षितिजावरती, धरणीवरती उतरून जाई
विशाल धरणी पसरुनी बाहू आग नभाची कवेत घेई
असह्य धग ती ऊरात घेऊन रक्तवर्ण सागरही होई
शांत शांत मग नभ नि धरणी, रात्र गारवा घेऊनी येई
चंद्रचांदण्या शिंपून नभीच्या दाह धरेचा शमवीत राही
शांत जरी हे सर्व रात्रभर, मनात दडपण घेऊन निजती
पोटामध्ये शूळास ठेवून प्रसव पहाटे देण्यासाठी
नभ-सागर नि धरणी मिळुनी तीच वेदना रोज झेलती
ही वेदनाच कारण जगण्याचे हे कठोर वास्तव तेही जाणती
No comments:
Post a Comment