नको करूंस वल्गना रावणा,Nako Karus Valgana Ravana

नको करूंस वल्गना रावणा निशाचरा !
समूर्त रामकिर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां

वंद्नास योग्य मी पराविया पतिव्रता
पुण्य जोड राक्षसा झणीं करुन मुक्तता
लाज राख नारिची वीर तूं जरी खरा

नृपति-पाप पाहतें, अनयनित्य साहतें
राष्ट्र तें जगावरी नाममात्र राहतें
काय आग लाविशी तुझ्या करें तुझ्या पुरा ?

जिथें तिथें दिसे मला लोकनाथ राम तो
शयनिं ये उशातळीं रामहस्तवाम तो
चिंतनांत पूजिते त्याच मी धनुर्धरा


योग्य एक त्यास मी, योग्य ना दुजा कुणा
परत धाड रे मला प्रियासमीप रावणा !
शरण त्यांस रक्षुनी राम देइ आसरा

सख्य जोड त्यासवें, हो कृतार्थ जीवनीं
नित्यशुद्ध जानकी राघवास अर्पुनी
ना तरी मृतीच ये चालुनी तुझ्या घरा

इंद्रवज्रही कधीं चुकेल घाव घालितां
क्षणहि आयु ना तुझे रामचंद्र कोपतां
रामबाणवृष्टि ती प्रळयसी भयंकरा

ठाकतां तुझ्यापुढें वीर युद्धकाम तो
ठेवणार वंश ना असा समर्थ राम तो
अधर्म काममूढ तूं, विचार हा करी जरा

बघेन रामबाण मी निडर या तुझ्या उरीं
कंक पंख पाठिशीं, नामचिन्ह ज्यावरी
भारमुक्त हो‌उं दे एकदां वसुंधरा

No comments:

Post a Comment