न कळता असे ऊन,Na Kalata Ase Oon

न कळता असे ऊन मागून येते
सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते

कितीदा हसूनी नव्याने जगावे ?

कितीदा रंग या जीवनाचे पहावे ?

जुई-मोगऱ्याला जसा गंध येतो
नवा गार वारा वनी वाहताना
मनासारखी मी तुझी होत जाते
तुला सांजवेळी पुन्हा पाहताना
पुन्हा एकमेकांस आधार होता
तुला मी, मला तू, अता पांघरावे

तुझ्यावाचुनी मी इथे राहताना
तुझ्या आठवांचा मनी जोगवा रे
घरासारखे वाटतो रे तरीही
नसे या घराला जुना गोडवा रे
घरी लोक माझेच सारे तरीही
असे एकटेपण कसे मी सहावे ?

जरी आपुले रक्त गोठून गेले
जरी भोवती सुन्न अंधार आहे
तुझा हात हातात आहे अजुनी
तुझी ज्योत जगण्यास आधार आहे
सुखालाच नाकारताना कशाला;
उगा आज डोळ्यांतुनी पाझरावे ?

कितीदा हसूनी नव्याने जगावे
कितीदा रंग या जीवनाचे पहावे

नदी जीवनाची तरी वाहते रे
कधी ऊन वा सावली लागते रे
नवे गाव, वाटा नव्या शोधुनीया
दिशा तांबडी रोजची सांगते रे
पुन्हा एकदा तू जगावे जगावे
नवे रंग या जीवनाचे पहावे

No comments:

Post a Comment