दोन बोक्यांनी आणला हो,Don Bokyani Aanala Ho

दोन बोक्यांनी आणला हो आणला, चोरून लोण्याचा गोळा
वाट्यामध्ये झाला हो त्यांच्या, परंतु सारा घोटाळा !


एक म्हणे, "म्याँव, म्याँव, नको पुढे येऊ !"
दुसरा म्हणतो, "म्याँव, म्याँव, हात नको लावू !"
खाण्यासाठी होता हो होता, लोण्यावर दोघांचा डोळा !

( या दोन मांजरांचं भांडणं माकडानं झाडावरून पाहिलं,
म्हणून तो टुणकन्‌ उडी मारुन खाली आला, आणि म्हणाला- )

"हुप्प, हुप्प, हुप्प, माझ्या शेपटीला तूप !
अरे, लोण्यासाठी मैत्रीला का लावता कुलूप ?
ऐका माझं, नका भांडू, रहा थोडे चूप."


बोके म्हणती, "माकड भाऊ, शकाल का हे भांडण मिटवू ?"

माकडदादा मान हलवूनी, एक तराजू येई घेऊनी
एक लहान तर एक मोठा !
लहान-मोठे केले त्याने वाटे, ठेवून लोण्यावर डोळा !

( पुढे तर माकडानी आणखीनच मज्जा केली बाबा !)

दोन बाजुला टाकून लोणी, माकड पाहू लागे तोलुनी.

एक पारडे खाली जाई, हळूच त्यातले काढून खाई.
म्हणती मांजरे, "तू का रे लोणी ऐसे खासी बरे ?"
माकड म्हणालं, "दोन सारखे वाटे होण्या असेच करणे योग्य ठरे."

माकडाने ते खाऊनी सारे लोणी, टुणकन्‌ पोबारा केला.

मज्जा झाली माकडाची, पुढे फजिती बोक्यांची !
दोघांमध्ये भांडण होता, होते चंगळ तिसऱ्याची.

त्या बोक्यांना आपल्या भांडणाचा, अस्सा धडा मिळाला !

No comments:

Post a Comment