धन्य मी शबरी श्रीरामा !
लागलीं श्रीचरणें आश्रमा
चित्रकुटा हे चरण लागतां
किती पावले मुनी मुक्तता
वृक्षतळिं या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा
या चरणांच्या पूजेकरितां
नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता
पदप्रक्षालन करा, विस्मरा प्रवासांतल्या श्रमां
गुरुसेवेंतच झिजलें जीवन
विलेपनार्थे त्याचे चंदन
रोमांचांचीं फुलें लहडलीं, वठल्या देहद्रुमा
निजज्ञानाचे दीप चेतवुन
करितें अर्चन, आत्मनिवेदन
अनंत माझ्या समोर आलें, लेवुनिया नीलिमा
नैवेद्या पण काय देउं मी ?
प्रसाद म्हणुनी काय घेउं मी ?
आज चकोरा-घरीं पातली, भुकेजली पौर्णिमा
सेवा देवा, कंदमुळें हीं
पक्व मधुरशीं बदरिफळें हीं
वनवेलींनीं काय वाहणें, याविन कल्पद्रुमा ?
क्षतें खगांचीं नव्हेत देवा,
मीच चाखिला स्वयें गोडवा
गोड तेवढीं पुढें ठेविलीं, फसवा नच रक्तिमा
कां सौमित्री, शंकित दृष्टी ?
अभिमंत्रित तीं, नव्हेत उष्टीं
या वदनीं तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा
No comments:
Post a Comment