दारीच्या देवळीत जळो पणति,Darichya Devalit Jalo Panati

दारीच्या देवळीत, जळो पणति सारि रात
प्रगटले न अजुन कांत, अंधकार अंतरात

रात्रंदिन वाट बघत, घालुनी पळी कडीत
येइ ना अजून मूर्त, माघारी मंदिरात

रांगोळी अंगणात, अश्रुबिंदु घालतात
गाल ओठ भिजुन जात, ओघळत्या काजळात

वृंदावनि सांजवात, नि:श्वासे विझुन जात
तुळशिच्या प्रदक्षिणांत, चर्र होत काळजात

नाथांची झालि साथ, फक्त सात पावलात
आज ऊर-तारु फुटत, विरहाच्या वादळात

कुंकवाच्या कोयरीत, रोज थबकतोहि हात
वैरी जे जे न चिंति, ते ते ये मनात

दारीच्या देवळीत, उजळवली कुणि ग वात ?
इश्श ते, तेच कांत, प्रगटले प्रकाशात

दास्यमुक्ति-संगरात, विजयी झालेहि कांत
मजसि मात्र अडवितात, प्रीतीच्या शृंखलात

No comments:

Post a Comment