जोगिया,Jogiya

कोन्यात झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली

तबकात राहिले देठ, लवंगा, साली.

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.

हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान,
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते ? - गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलते ओठी.

साधता विड्याचा घाट, उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान ?

चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
"का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने ?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग -
हालले, साधला भाव स्वरांचा योग,
घमघमे, जोगिया दंवांत भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.

"मी देह विकुनिया मागुन घेते मोल,
जागविते प्राण हे ओपुनिया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुन तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गे वनमाली
लाविते पान ... तो निघून गेला खाली.

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी

"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !"

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार;
हासून म्हणाल्ये, "दाम वाढवा थोडा ...
या पुन्हा, पान घ्या ..." निघून गेला वेडा !

राहिले चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?

तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत,
वळुनी न पाहता, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.

हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे.

1 comment:

  1. วันนี้จะมาแนะนำ ทดลองเล่นสล็อต megagame กับเว็บไซต์เราได้เเล้ววันนี้ที่ MEGA GAME ทุกท่านจะพบ กับเกมสล็อตออนไลน์ รูปแบบใหม่มีมากกว่า 1000 เกมที่เราได้คัดสรรมาให้นักเสี่ยงโชค

    ReplyDelete