आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा
चापबाण घ्या करीं सावधान राघवा !
मेघगर्जनेपरी, काननांत हो ध्वनी
धांवतात श्वापदें, भक्ष्यभाग टाकुनी
कोंकतात भेंकरें, कंपितांग थांबुनी
धूळ ही नभीं उडे, सैन्य येतसे कुणी
खूण ना दिसो कुणा, दीप्त अग्नि शांतवा
उत्तरेस तो थवा, काय तर्क बांधुनी ?
पाहतोंच काय तें, तालवृक्षिं जाउनी
कोण येइ चालुनी, निर्मनुष्य ह्या वनीं
सिद्ध राहूं द्या तळीं, चाप रज्जू ओढुनी
पाहुं वीर कोण तो, दावि शौर्य-वैभवा
कैक पायिं धांवती, हस्ति अश्व दौडती
धर्मस्नात सारथी, आंत ते महारथी
कोण श्रेष्ठ एक तो, राहिला उभा रथीं
सांवळी तुम्हांपरी, दीर्घबाहु आकृती
बंधु युद्धकाम का, शोधुं येइ बांधवा ?
भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो
येउं दे पुढे जरा, कंठनाल छेदतों
कैकयीस पाहं दे, छिन्न पुत्रदेह तो
घोडदौड वाजते, ये समीप नाद तो
ये पुनश्च आज ही, संधी शस्त्रपाटवा
एक मी उभा इथें, येउं देत लाख ते
लोकपाल तो नवा, स्वत्वहीन लोक ते
क्षम्य ना रणांगणीं, पोरकेंहि पोर तें
शत्रुनाश क्षत्रियां, धर्मकार्य थोर तें
ये समोर त्यास मी, धाडितोंच रौरवा
नावरेच क्रोध हा बोधिल्या अनेकदा
राम काय जन्मला सोसण्यास आपदा
होउं देच मेदिनी पापमुक्त एकदा
भरतखंड भोगुं दे रामराज्य संपदा
धर्मरक्षण-क्षणीं, मी अजिंक्य वासवां
No comments:
Post a Comment