चढवू गगनि निशाण,Chadhavu Gagani Nishan

चढवू गगनि निशाण, आमुचे चढवू गगनि निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःक्रांतिचे, समतेचे अन्‌ विश्वशांतिचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुखतेज महान

मुठ न सोडू जरि तुटला कर; गाऊ, फासहि आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही, झाले जरि शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाउस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण

विराटशक्ती आम्ही वामन, वाण आमुचे दलितोद्धारण

नमवू बळिचा किरीट उद्धट ठेवुनि पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरति निशाण

No comments:

Post a Comment