काठी न्‌ घोंगडी घेऊन,Kathi Na Ghongada Gheun

काठी न्‌ घोंगडी घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

दिसं आलाय माथ्यावर, बघ दुपार झाली भर
त्या गोट माळावर कुणबी सोडुनी नांगर
टाकी वैरण बैला म्होरं, घेतो इसावा घटकाभर
त्याची अस्तूरी सुंदर, आली घेउनी भाकर
पाय भाजत्याती चरचर अन्‌ कशी चालतीया झरझर
कांदा न्‌ भाकरी खाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

पळपळून म्या चौखुर, वळती करुन आणल्यात गुरं
हणम्या बैल हाय ह्यो माजूर, देतो झुकांडी जातो दूर
गाय कपिली लई चातूर, दूधदूध दियाला भरपूर
गुरं पाण्यावर नेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

मी लोकाचा हाय चाकूर, जीव जमून होतोय चूर
धनी माझा लय्‌ मगरूर, मालकीन करी कुरकूर
पायामंदी नाही खेटूर, चिंधी फाटतीया टुरटूर
अरं दुपार टळून जाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

सदू सोनाराचा शिरीधर, मधु बामनाचा मुरलीधर
चोखू चांभाराचा चंदर, वरल्या आळीचा जालंधर
घराशेजारी आपली घरं, बाळपणातलं मैतर
अरं तुमच्यात सामील होऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

No comments:

Post a Comment