कंठ आणि आभाळ दाटून येती
आणि कोसळती ..... सरीवर सरी !
पहिल्या उन्हाची हळद ओली होती
फांदीवर पाने जन्म घेत होती
भवताल त्यांना अजून ठाऊक नव्हता
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !
आता कुठे नुकतेच पंख लांब केले
आता कुठे घरट्यातून फांदीवर आले
आभाळ या पिलांचे खूप लांब आहे
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !
उधाण आहे आकाश पेलताना
उभ्या जन्माचा पाऊस झेलताना
स्वत:चे स्वत:शी लढणे दिनरात आहे
अशा वेळी आल्या ..... सरीवर सरी !
आणि कोसळल्या ..... सरीवर सरी !
No comments:
Post a Comment