अंकूर,Ankur

सखे ग सये गाऊया आता आनंदाची गाणी ग
आंतल्या आंत पिऊन टाकू डोळ्यांतले पाणी ग
पाण्यावर त्या एक नव्याचा फुटेल अंकूर ग
विसावयाला एक नव्याने मिळेल माहेर ग

माहेरी जाऊन एकदा फिरून लहान होऊ या ग
धरून आईच्या बोटाला नवे पाऊल टाकू या ग
मायेच्या गावा मळभ सारे क्षणांत विरेल ग
मानातले जे येईल ओठी होईल सुरेल ग
तेजाची भाषा नवीन आशा डोळ्यांत हसेल ग
भल्या आडचे बुरेही तेव्हा सहज दिसेल ग


राजहंस तो सहज ओळखी मोत्यांमधले पाणी ग
फक्त विणकरा ऐकू येती धोट्यामधली गाणी ग
नि:शब्दाच्या कुशीत अलगद गूज नव्याचे रुजते ग
स्वागत करण्या त्याचे अन्‌ मग सृष्टी सारी सजते ग

तुला नि मला दावील दिशा एक स्वत:चा तारा ग
शोधून त्याला जिंकून घेऊ खेळ हा सारा ग

No comments:

Post a Comment