आला खुशीत्‌ समिंदर, Aala Khushit Samindar

आला खुशीत्‌ समिंदर, त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !


हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,
सफेत फेसाची वर खळबळ,
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर, ओढी खालीवर,
पाण्यावर देइ ना ग ठरू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !
तांबडं फुटे आभाळांतरी,
रक्तावाणी चमक्‌ पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी !
झाला खुळा समिंदर, नाजुक्‌ होडीवर,

लाटांचा धिंगा सुरू
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !

सूर्यनारायण हसतो वरी,
सोनं पिकलं दाहिदिशांतरी,
आणि माझ्याहि नवख्या उरी !
आला हासत समिंदर, डुलत फेसावर,
होडीशी गोष्ट करू,
सजणे, होडीला बघतोय्‌ धरू !

गोऱ्या भाळी तुझ्या लाल्‌ चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी,
उरी कसली ग गोड शिरशिरी ?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,
चाले होडी भुरुभुरू,
सजणे, वाऱ्यावर जणु पाखरू !

No comments:

Post a Comment