आज दिसे का चंद्र गुलाबी ?
हवेस येतो गंध शराबी
अष्टमिच्या या अर्ध्या राती
तुझी नी माझी फुलली प्रीती
अर्धे मिटले, अर्धे उघडे
ह्या नयनांतुन स्वप्न उलगडे
तळहातावर भाग्य उतरले
हात तुझा रे माझ्या हाती
स्वप्नि तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्न देखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोती
अर्धी मिटली, अर्धी उघडी
खिडकी मजसी दिसे तेवढी
अनुरागाच्या मंजुळ ताना
कर्णफुलासम कानी येती
या स्वप्नातच जीव भरावा
कैफ असा हा नित्य उरावा
अशीच व्हावी संगमरवरी
अर्धोन्मिलीत अपुली नाती
No comments:
Post a Comment