अजून त्या झुडुपांच्या,Ajun Tya Jhudupanchya

अजून त्या झुडुपांच्या मागे, सदाफुली दोघांना हसते
अजून अपुल्या आठवणींनी, शेवंती लजवंती होते

तसे पहाया तुला मला ग, अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव अजून ताठर चंपक झुरतो

पाठ आठवुन तुझी बिलोरी, अजून हिरवळ हिरमुसलेली
चुंबायाला तुझी पावले फूलपाखरे आसुसलेली

अजून गुंगीमध्ये मोगरा, त्या तसल्या केसांच्या वासे
अजून त्या पात्यात लव्हाळी होतच असते अपुले हासे

अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे
गीतांमधले गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे

No comments:

Post a Comment