TUJHE NI MAJHE NATE तुझे नि माझे नाते



तुझे नि माझे नाते काय ?
तू देणारी मी... मी घेणारा
तू घेणारी... मी देणारा
कधी न कळते रूप बदलते
चक्राचे आवर्तन घडते
आपुल्यामधले फरक कोणते ?
अन् आपुल्यातून समान काय ?

मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...
सुंदर स्वप्ने पडत असतील,
पण कुशीवर वळेल... उसासेल...
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल
तिच्यासमोरी तेच ढग.. जे माझ्या समोर
तिच्यासमोरही तेच धुक .. जे माझ्या समोर !
तिचे माझे स्वल्पविरामही सारखे अन् पूर्ण विरामही !
म्हणून तर मी असा आकंठ जागा असताना
तिचीही पापणी पूर्ण मिटली नसेल...
मला खात्री आहे तिलाही झोप आली नसेल...

सुख-दु:खाची होती वृष्टी
कधी हसलो, कधी झालो कष्टी
सायासा वीण सहज ची घडते
समेस येता टाळी पडते!
कुठल्या जन्मांची लय जुळते ?
या मात्रांचे गणित काय ?
तुझे नि मझे नाते काय ?

बगीचे लावले आहेत आम्ही एकत्र .. एकाकी
माती कालवली आहे आम्ही चार हातांनी
नखात माती आहे आम्हा दोघांच्या...अजूनही
मनात फुलं आहेत आम्हा दोघांच्या... अजूनही
दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत !
दोघांच्याही ओठा वर एकमेकांची भाषा आहेत !
रात्री होऊन जाईल चंद्र चंद्र आणि मी जागाच असेन ;
तेव्हा बर्फाच्या अस्ताराखाली वाहत राहावी नदी
तशी ती ही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिलाही झोप आली नसेल...

नात्याला या नकोच नाव
दोघांचाही एकच गाव!
वेगवेगळे प्रवास तरीही
समान दोघांमधले काही !
ठेच लागते एकाला
का रक्ताळे दुसर्‍याचा पाय ?
तुझे नि माझे नाते काय ?

Lyrics -संदीप खरे SANDEEP KHARE
Singer -डॉ. सलील कुलकर्णी DR.SALIL KULAKARNI

No comments:

Post a Comment