उगा कां काळिज माझें उले ?
पाहुनी वेलीवरचीं फुलें
कधी नव्हे तें मळलें अंतर
कधीं न शिवला सवतीमत्सर
आज कां लतिकावैभव सले ?
काय मना हें भलतें धाडस ?
तुला न आवडे हरिणी-पाडस
पापणी वृथा भिजे कां जलें ?
गोवत्सांतिल पाहुन भावां
काय वाटतो तुजसी हेवा ?
चिडे कां मौन तरी आंतलें ?
कुणी पक्षिणी पिलां भरविते
दृश्य तुला तें व्याकुळ करितें
काय हें विपरित रे जाहलें ?
स्वतःस्वतःशीं कशास चोरी ?
वात्सल्याविण अपूर्ण नारी
कळालें सार्थक जन्मांतले
मूर्त जन्मते पाषाणांतुन
कौसल्या का हीन शिळेहुन ?
विचारें मस्तक या व्यापिलें
गगन अम्हांहुनि वृद्ध नाहि का ?
त्यांत जन्मती किती तारका !
अकारण जीवन हें वाटलें
No comments:
Post a Comment