Showing posts with label M-रवि दाते. Show all posts
Showing posts with label M-रवि दाते. Show all posts

समजावुनी व्यथेला,Samajavuni Vyathela

समजावुनी व्यथेला समजावता न आले !
मज दोन आसवांना हुलकावता न आले !

सर एक श्रावणाची आली, निघून गेली
माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले ?

चुकवूनही कसा हा चुकला न शब्द माझा
देणे मलाच माझे नाकारता न आले !

केले जरी खुलासे मीही नकोनकोसे,
जगणे अखेर माझे मज टाळता न आले !

पहाटे पहाटे मला जाग,Pahate Pahate Mala Jag

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !

मला आठवेना, तुला आठवेना
कशी रात्र गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली !

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली !

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली !

दुभंगून जाता जाता,Dubhangun Jata Jata

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो

सल जुनेच सलता सलता सुखावून गेले
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो

किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो
सर्व संग सुटले, माझा मीच संग झालो


ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी
तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो

अता राहिलो मी जरासा,Ata Rahilo Mi Jarasa

अता राहिलो मी जरासा जरासा
उरावा जसा मंद अंती उसासा

कसा कोरडा कोरडा जन्म गेला
कसा रोज मी पीत गेलो पिपासा

कसे ओठ तू बंद केलेस माझे
करावा कसा आसवांनी खुलासा ?

असे हे कसे जीवनाचे दिलासे ?
दिलाशांस मी देत आहे दिलासा !

आताच अमृताची बरसून, Aatacha Amrutachi Barsun

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

माझ्या मिठीत केली कुजबूज चांदण्याने
ते बोलणे तरीही समजून रात गेली

उरले जराजरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

सांगूनही कुणाला कळणार काय आता ?
माझी कुंवार गीते उजवून रात गेली !

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?



आता जगायाचे असे माझे, Aata Jagayache Ase Majhe

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ?

हदुयात विझला चंद्रमा .... नेत्री न उरल्या तारका ....
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले !

अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा ?
अजुनी मला फसवायला कुठले निमंत्रण राहिले ?

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ....
मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले ?

कवटाळुनी बसले मला दाही दिशांचे हुंदके
माझे अता दुःखासवे काही न भांडण राहिले !

होता न साध्य एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले !

अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली ...
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले ?

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !